Pombhurna News : चिंतलधाबा आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण! ११ महिन्यांत इमारत पूर्ण

Bhairav Diwase

चंद्रपूर:- 
ग्रामीण भागातील सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा आपल्या गावाजवळच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने चिंतलधाबा येथे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. अवघ्या ११ महिन्यांत या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन लोकार्पण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच, ही वास्तू केवळ एक इमारत न राहता येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार, आधार आणि दिलासा देणारी सेवा केंद्र ठरली पाहिजे, अशी अपेक्षा आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. चिंतलधाबा, देवई, केमारा, खरवट आणि भटाळी या पाच गावांतील नागरिकांना या उपकेंद्राच्या माध्यमातून आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. रुग्णांना चोवीस तास सेवा मिळावी यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या बांधकामाला दहा दिवसांत प्रशासकीय मंजुरी देऊन पुढील नऊ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देशही आ.मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.


या लोकार्पण कार्यक्रमाला भाजपा प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, तालुकाध्यक्ष हरीश ढवस, भाजपा महामंत्री विनोद देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार,तहसीलदार मोहनीश शेलवटकर, गटविकास अधिकारी नमिता बांगर, उपसरपंच रोशन ठेंगणे, माजी सरपंच शुभांगी कुत्तरमारे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना खंडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पूर्वी एखाद्या इमारतीचे भूमिपूजन झाल्यानंतर तिचे बांधकाम दोन ते पाच वर्षे रखडण्याचे प्रकार घडत असत. मात्र, चिंतलधाबा येथील आरोग्य उपकेंद्राचे वैशिष्ट्य वेगळे आहे. अकरा महिन्यांपूर्वी याच ठिकाणी माझ्या हस्ते भूमिपूजन झाले आणि अवघ्या अकरा महिन्यांत बुलेट ट्रेनच्या वेगाने इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. आज या वास्तूचे लोकार्पण होत आहे. ही वास्तू निर्जीव असली, तरी येथे येणाऱ्या प्रत्येक सजीवाला न्याय देण्याची भूमिका या केंद्राने घेतली पाहिजे. गोरगरीब रुग्णांची सेवा हीच या वास्तूची खरी ओळख ठरली पाहिजे.
आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, रुग्णांसाठी बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, बोअरवेल, वातानुकूलित व्यवस्था आणि परिसरात वृक्षलागवड अशा आवश्यक सुविधांबाबत आ.मुनगंटीवार यांनी सूचना केल्या. इमारतीत अथवा परिसरात कोणत्याही सुविधा कमी असल्यास त्यांची यादी तयार करून द्यावी. आवश्यक त्या सर्व सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी आपण घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात चिंतलधाबा ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावून ५० लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे. ग्रामपंचायतीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी सरपंच शुभांगी कुत्तरमारे, माजी उपसरपंच रोशन ठेंगणे आणि संपूर्ण ग्रामपंचायतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो, असे आ.मुनगंटीवार म्हणाले.


पोंभुर्णा तालुका पूर्वी मागास आणि औद्योगिक विकासापासून दूर असलेला तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र, आज येथे उत्तम विश्रामगृह, दर्जेदार ग्रामीण रुग्णालये आणि विविध पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत. आरोग्य क्षेत्रातही अधिक व्यापक काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.जिल्ह्याच्या आरोग्यसेवांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर येत असून, येत्या ४ तारखेला त्यांच्या हस्ते सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्यवर्धिनी समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीच्या माध्यमातून मतदारसंघातील आजारी व्यक्तींना योग्य उपचार मिळावेत, आजारांचे अचूक निदान व्हावे आणि नागरिक आजारीच पडू नयेत यासाठी आरोग्यविषयक जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाय आणि योग्य जीवनशैलीबाबत प्रयत्न व्हावेत, अशी भूमिका आ.मुनगंटीवार यांनी मांडली.


येत्या १२ जानेवारी रोजी चंद्रपूर येथे २५ हजार युवकांच्या सहभागातून भव्य युवा संमेलन आयोजित करण्यात येत आहे. निबंध आणि घोषवाक्य स्पर्धांच्या माध्यमातून युवकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, समाजात जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा आणि व्यसनमुक्त, सक्षम व सशक्त भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्यापासून संस्कारापर्यंत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही आ.मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले.


शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेतकरी आयोगाची मागणी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपली भूमिका मांडताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कष्टांविषयीची संवेदनशीलता व्यक्त केली. मातीशी नाते जोडून अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या हक्कासाठी वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. त्याच्या तक्रारींची दखल घेऊन त्याला वेळेत न्याय मिळाला पाहिजे. यासाठी शेतकरी आयोग स्थापन करण्याची मागणी आपण केली आहे. या आयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे ३० दिवसांत निराकरण होऊन त्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा व्हावा, हा या मागणीमागील प्रमुख उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.पोंभुर्णा तालुक्यात टाटा समूहाच्या माध्यमातून ९० गावे दत्तक घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अशा उपक्रमांची व्याप्ती वाढविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.


पोंभुर्णा तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधींची तरतूद

पोंभुर्णा तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेताना आमदार मुनगंटीवार यांनी स्मशानभूमीच्या विकासासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्याची घोषणा केली. २५१५ योजनेअंतर्गत जगन्नाथ बाबा मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी २० लाख, व्यायामशाळेसाठी १० लाख, वर्गखोली बांधकामासाठी १० लाख, भोजनकक्षासाठी १० लाख, नाली बांधकामासाठी २० लाख, सामाजिक सभागृहासाठी ३० लाख, कचरा विलगीकरण शेडसाठी २५ लाख आणि आरोग्य उपकेंद्र इमारतीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत नाली बांधकामासाठी १५ लाख, नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी २५ लाख आणि जगन्नाथ बाबा मंदिर परिसरातील सभागृहासाठी ३० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासह विविध विकासकामांसाठी एकूण ३ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.विशेष बाब म्हणून पाणीपुरवठा योजनेसाठी ४० कोटी रुपयांचा निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर करून देण्यात आला आहे. तसेच नगराध्यक्षांच्या मागणीनुसार पोंभुर्णा नगर परिषदेच्या विविध विकासकामांसाठी आणखी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आ.मुनगंटीवार यांनी जाहीर केले.


ऊर्जास्वावलंबनापासून ग्रामीण विकासापर्यंत चिंतलधाबासाठी विशेष प्रयत्न

उथळपेठ येथे सोलरग्रामचा राज्यातील पहिला प्रयोग राबवून संपूर्ण गाव सौरऊर्जेवर आणण्यात आले. महाराष्ट्रात २१ गावे सौरऊर्जेवर आली असली, तरी राज्यातील सर्वात मोठे सोलरग्राम म्हणून उथळपेठने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच धर्तीवर चिंतलधाबा गावात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी १ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामीण भागात विकासाच्या आधुनिक संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.यावेळी चिंतलधाबा ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांना हनुमानजींची मूर्ती भेट देण्यात आली. हनुमानजी हे सेवाभाव, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत समाजाची सेवा करण्याची भावना प्रत्येकाने जपली पाहिजे, असे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.