मुंबई:- पोलीस भरती, अग्निवीर तसेच शारीरिक चाचणी आवश्यक असलेल्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या उमेदवारांना शारीरिक चाचणीच्या सरावासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालयांची मैदाने विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले असून, राज्यातील लाखो होतकरू उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.
पोलीस भरती आणि अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांना सरावासाठी सुरक्षित मैदाने उपलब्ध होत नसल्याने पहाटेच्या वेळी मुख्य रस्त्यांवर किंवा शहराबाहेरील टेकड्यांवर धावण्याचा सराव करावा लागतो. यामुळे अपघात आणि दुखापतींचा धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेता, उमेदवारांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात सराव करता यावा, यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये तसेच शासकीय आणि इतर वरिष्ठ महाविद्यालयांच्या मालकीची किंवा व्यवस्थापनाखाली असलेली क्रीडांगणे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना विनामूल्य उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, सकाळी ५ ते ९ या वेळेत उमेदवारांना सरावासाठी मैदान उपलब्ध करून देता येणार आहे. तसेच संध्याकाळच्या सरावासाठी संबंधित महाविद्यालय किंवा विद्यापीठ प्रशासन वेळ निश्चित करणार आहे.
मैदानाचा वापर करताना उमेदवारांना स्वच्छता, मालमत्तेचे संरक्षण आणि संस्थेची शिस्त पाळावी लागणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना ओळखपत्र तपासणी किंवा नोंदणीची व्यवस्था करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश विद्यापीठांचे कुलसचिव आणि विभागीय सहसंचालकांना देण्यात आले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अहवाल शिक्षण संचालनालयाला सादर करण्यास सांगण्यात आले आहे.


