चंद्रपूर:- समोर वाघ... आणि वाघासमोर दुचाकीस्वार! दोघेही एकमेकांकडे पाहत जागेवरच थांबले... तब्बल दोन ते तीन मिनिटांचा हा थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पद्मापूर ते मोहर्ली मार्गावरील कालापाणी परिसरात ही घटना घडली.
एक दुचाकीस्वार पद्मापूरहून मोहर्लीच्या दिशेने जात असताना अचानक त्याच्या समोर रस्त्यावर वाघ बसलेला दिसला. वाघ अगदी जवळ असल्याने दुचाकीस्वाराने कोणतीही हालचाल न करता जागेवरच थांबणे पसंत केले.
विशेष म्हणजे, वाघ दुचाकीस्वाराकडे आणि दुचाकीस्वार वाघाकडे पाहत असल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.
तीन मिनिटांचा थरार कॅमेऱ्यात कैद!
याच मार्गावरून समोरून येणाऱ्या एका बसमधील प्रवाशाने हा संपूर्ण थरार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. काही वेळ एकमेकांकडे पाहिल्यानंतर वाघ शांतपणे उठला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर दुचाकीस्वारासह बसमधील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वनविभागाकडून चौकशी सुरू!
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने या घटनेची दखल घेतली आहे. संबंधित दुचाकीस्वार कोण होता आणि या घटनेत काही नियमांचे उल्लंघन झाले का, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ताडोबा परिसरात वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेता पर्यटक आणि वाहनचालकांनी सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा या घटनेतून अधोरेखित झाली आहे.



