Accident News : नागपूर-सिंदेवाही मार्गावर कारची वाघाला जोरदार धडक; वाघ गंभीर जखमी!

Bhairav Diwase
चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात नागपूर-सिंदेवाही मार्गावर मेंढा मालजवळ एक अपघात घडला आहे. भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या वाघाला जोरदार धडक दिल्याने वाघ गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात वाघाच्या कमरेखालील भागाला मोठा मार लागला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार नागपूरहून बल्लारपूरच्या दिशेने जात असताना मेंढा मालजवळ अचानक रस्ता ओलांडणारा वाघ कारच्या धडकेत जखमी झाला. अपघातानंतर वाघ जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाघाला डार्ट मारून बेशुद्ध केले. त्यानंतर वाघाला सुरक्षितपणे जेरबंद करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये रवाना करण्यात आले आहे.