Chandrapur News: चंद्रपूरच्या आयुक्तांचा गणपती करू; बच्चू कडू यांचा इशारा

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
दिव्यांगांच्या हक्काच्या निधीवरून चंद्रपूर महानगरपालिका आता चांगलीच अडचणीत सापडली आहे. दिव्यांग क्रांती प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी चंद्रपूर महापालिकेवर धडक देत प्रशासनाच्या कारभाराचा पंचनामा केला आहे.

गेली चार वर्षे दिव्यांगांचा निधी खर्चच न केल्याप्रकरणी त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली असून, सुधारणा नाही झाली तर आयुक्तांचा 'गणपती' करू, असा सज्जड इशारा दिला आहे.


दिव्यांग क्रांती प्रहार संघटनेचे प्रमुख तथा आमदार बच्चू कडू चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेसमोर न्याय मागण्यासाठी बसलेल्या दिव्यांगांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी आंदोलक दिव्यांगांनी त्यांच्यासमोर हरोहरो तक्रारींचा पाढा वाचत दिव्यांग कल्याण निधीचा एक रुपयाही खर्च न झाल्याचा गंभीर आरोप केला.


दिव्यांगांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत आ. बच्चू कडू यांनी तात्काळ महानगरपालिकेत धडक दिली आणि अधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत मागील सलग चार वर्षांपासून दिव्यांगांसाठी असलेला निधी जसाच्या तसा पडून असल्याचा आणि तो खर्चच न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार उघडकीस येताच बच्चू कडू यांचा संताप अनावर झाला.

अधिकारी वर्गाच्या या असंवेदनशील कारभारावर संताप व्यक्त करत बच्चू कडू म्हणाले की, "दिव्यांगांच्या हक्काच्या निधीवर ताजी मारणाऱ्या आणि तो खर्च न करणाऱ्या आयुक्तांना हयगय सहन केली जाणार नाही. हा निधी तात्काळ खर्च झाला पाहिजे, अन्यथा चंद्रपूर महापालिका आयुक्तांचा गणपती करू आणि संपूर्ण शहरातून त्यांची मिरवणूक काढू!" त्यांच्या या आक्रमक इशाऱ्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणेत मोठी धावपळ उडाली आहे.