चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून, आज पुन्हा एकदा एका निरपराध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. शेतात रोजच्या जगण्यासाठी काम करायला गेलेल्या एका ६० वर्षीय महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी-२ बिटात आज दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. मंदा सूर्यभान मंगाम (वय अंदाजे ६० वर्ष, रा. आगरझरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदाबाई या आगरझरी बिटातील राखीव वन कक्ष क्रमांक १८७ लगत असलेल्या त्यांच्या सर्व्हे क्रमांक १०/४ मधील स्वतःच्या शेतात शेतीची कामे करत होत्या. यादरम्यान, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. वाघाच्या या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि दुर्गापूर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थीपे आणि पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आला आहे.
दिवसाढवळ्या घडलेल्या या आक्रमक हल्ल्यामुळे आगरझरी आणि परिसरातील गावकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलालगतच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वनविभावाने या भागात तातडीने बंदोबस्त वाढवावा आणि वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता संतापलेल्या ग्रामस्थांकडून होत आहे.

