Deekshabhoomi Chandrapur : चंद्रपूरात दीक्षाभूमी मुक्तीसाठी आंदोलन: १६ सप्टेंबरला भव्य आक्रोश मोर्चा!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- इतिहास आणि संस्कृतीच्या पटलावर चंद्रपूर जिल्ह्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक भारतात बौद्ध धम्माच्या इतिहासात चंद्रपूरचे नाव सुवर्णक्षरांनी कोरले गेले आहे, कारण याच पवित्र भूमीवर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आग्रहाखातर सुमारे तीन लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा शेवटचा धम्मदीक्षा सोहळा होता. मात्र, याच ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या विकासाबाबत मागील ३६ वर्षांपासून गंभीर उदासीनता पाहायला मिळत आहे. Deekshabhoomi Chandrapur 


चंद्रपूर दीक्षाभूमी संचालित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर' या संस्थेवर मागील छत्तीस वर्षांपासून एकाच परिवारातील संबंधित सदस्यांचे नियंत्रण असल्याची खंत बौद्ध समाजात व्यक्त होत आहे. या काळात दीक्षाभूमीचा किंवा बुद्धविहारचा हवा तसा विकास झालेला नाही, ज्यामुळे जनतेमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, दीक्षाभूमीच्यामुक्तीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी मागील एक वर्षापासून जिल्ह्यातील युवकांनी स्वाक्षरी मोहीम आणि जनजागृती अभियानाला सुरुवात केली. चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा तालुक्यांत बैठका घेऊन हा प्रश्न जनमानसात मांडण्यात आला. त्यानंतर १७ ऑगस्ट २०२६ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे शेकडो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी मुक्तीसाठी व्यापक आंदोलन करण्याचे आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले. Deekshabhoomi


या अनुषंगाने, १९ ऑगस्ट २०२६ रोजी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची भेट घेऊन १६ आणि १७ ऑक्टोबरच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम समाजाच्या सहभागातून पार पाडणे, दीक्षाभूमी व बौद्धविहाराचा विकास करणे आणि मेमोरियल सोसायटीच्या परिवारशाहीबाबत चर्चा केली. प्रशासनाने यावर सकारात्मक प्रतिसाद देत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. Chandrapur Deekshabhoomi


या सर्व घडामोडींची दखल घेत, मेमोरियल सोसायटीच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात समाजबांधवांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, विविध तालुक्यांत आणि वॉर्डातून आलेल्या बौद्ध बांधवांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तर आयोजकांना देता आले नाही. परिणामी, वाढत्या रोषापुढे आयोजकांना सभा बरखास्त करावी लागली. या प्रकारामुळे बौद्ध आंबेडकरी समाजात आणखी संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी मेमोरियल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या निष्क्रीय कारभाराबद्दल तात्काळ पायउतार होण्याचे आव्हान केले आहे. Deekshabhoomi


या संपूर्ण घटनांचा आढावा घेत, बौद्ध आंबेडकरी जनतेच्या वतीने आगामी १६ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.