Gadchiroli Naxal : 50 आत्मसमर्पित माओवाद्यांना निरोप, मूळ जिल्ह्यात रवानगी!

Bhairav Diwase
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता संपुष्टात आला असून आज पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नाही. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवादी विरोधी अभियानांसोबतच शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांनी अहिंसेचा मार्ग स्विकारुन अनेक जहाल माओवाद्यांनी पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. यापैकी एकूण 50 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्रात परत पाठविण्यात येऊन त्यांच्या निरोप समारंभाचे दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी आयोजन करण्यात आले होते.


सविस्तर वृत असे आहे की, आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण 819 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या माओवादी सदस्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला पूढे नेत, गेल्या काही महिन्यांपासून पुनर्वसन प्रक्रियेत असलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना आज दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी त्यांच्या मूळ जिल्ह्यात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले आहे. आत्मसमर्पणानंतर सदर सदस्यांचे समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्वसन व्हावे यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणानुसार त्यांना विविध लाभ देण्यात आले आहेत. यामध्ये आर्थिक सहाय्य, आवश्यक शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता तसेच पुनर्वसनासाठी विविध रोजगार, स्वयं रोजगार, प्रशिक्षणाचा लाभ यांचा समावेश आहे. 


गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून या पुनर्वसन कालावधीत केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राबवता आत्मसमर्पित सदस्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या आरोग्य व शारीरिक क्षमतेकडे विशेष लक्ष देण्यात आले. ऑपरेशन रोशनी अतंर्गत नेत्रोपचार शिबीरे व नसबंदी री-ओपनिंग सारख्या आवश्यक शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि सामाजिक समावेशन, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ध्यान, योग, शिबीरे आयोजीत करण्यात आले. तसेच प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करुन 46 आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. 88 आत्मसमर्पित माओवादी यांना लॉयेड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमीटेड कंपनीत कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. 

यावेळी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत विविध प्रकारची मदत देण्यात आली आहे. आत्मसमर्पित सदस्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करुन आत्मनिर्भर बनावे, कुटंुबासोबत सुरक्षित व सुखी जीवन जगावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पूढे जावे, तसेच आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबध्द आहे. या कार्यक्रमप्रसंगी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी देखिल आपले मनोगत व्यक्त करुन पोलीस दलाने वेळोवेळी सहकार्य केल्याची भावना व्यक्त केली. 


कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, सहायक पोलीस अधीक्षक, धानोरा श्री. सुयश कुमार सिंग, सहायक पोलीस अधीक्षक, भामरागड श्री. सागर भामरे, पोलीस उप-अधीक्षक, (अभियान) श्री. सुनिल उईके, यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. नरेंद्र पिवाल व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.