Chandrapur political News: चंद्रपूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय शक्तीप्रदर्शन

Bhairav Diwase
भाजप, काँग्रेस आणि सेनेच्या स्वागत पेंडालने वेधले लक्ष!
चंद्रपूर:- चंद्रपुरात गणेशोत्सवाच्या सांगर्तेनंतर निघालेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात लागलेल्या राजकीय स्वागत पेंडालने सर्वसामान्य नागरिकांचे आणि गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधले.


मिरवणूक मार्गावर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उभारलेले हे स्वागत कक्ष चर्चेचा विषय ठरले. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) २, कॉंग्रेसचे २ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे २ असे एकूण स्वागत पेंडाल उभारण्यात आले होते.


या स्वागत पेंडालच्या माध्यमातून पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी गणेशभक्तांचे स्वागत केले. यामध्ये भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांचे पेंडाल होते. तर काँग्रेस पक्षाकडून खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वतीने स्वागत मंच सजवण्यात आले होते. तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाकडून जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आणि युवासेना प्रमुख विक्रांत सहारे आणि नेते सुरेश पचारे यांचेही स्वागत पेंडाल या मिरवणूक मार्गावर पाहायला मिळाले.


एकीकडे लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता, तर दुसरीकडे या राजकीय स्वागत पेंडाल्समुळे चंद्रपूरच्या विसर्जन मिरवणुकीत राजकीय चर्चांना उधाण आलेले दिसून आले.