पोंभूर्णा:- तालुक्यातील चेक बल्लारपूर येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारासाठी चंद्रपूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २५) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. चरणदास शेडमाके (४२, रा. चेक बल्लारपूर) व चरणदास पेंदोर (४५, रा. चेक बल्लारपूर) असे मृतकांची नावे आहेत.
चरणदास शेडमाके हे शेतीची कामे आटोपून दुचाकी (MH ३४ W ७४७९) ने गावाकडे जात होते. त्याचवेळी चरणदास पेंदोर हे दुचाकी (MH ३४ AE ०५७७) ने गावाकडून शेतीकडे जात होते. शंकर अडबाले यांच्या शेताजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात चरणदास शेडमाके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चरणदास पेंदोर हे गंभीर जखमी झाले. नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी चरणदास शेडमाके यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी चरणदास पेंदोर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला.

