Chimur News: पुजेच्या नावाखाली विवाहितेवर अत्याचार

Bhairav Diwase
मुख्य 'भोंदू महाराजासह' तिघे अटकेत

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि मानवी मनाला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत एका भोंदू बुवाने विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २७ वर्षीय महिलेचे पती गेल्या काही दिवसांपासून सतत आजारी होते. या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी कुटुंबीयांनी शुभम खंगार या स्वयंभू 'महाराजाशी' संपर्क साधला. शुभमने घरात 'ग्रहशांती' आणि 'कालसर्पदोष निवारण' पूजा करण्याचा सल्ला दिला.


रविवारी मध्यरात्री या पूजेचे विधी सुरू होते. पूजा अंतिम टप्प्यात असताना भोंदू महाराज आणि त्याच्या साथीदारांनी एक कट रचला. पूजेचे उरलेले साहित्य आणण्याच्या बहाण्याने त्यांनी पीडितेच्या पतीला घराबाहेर पाठवले. पती जाताच, या महाराजांने असहाय्यतेचा गैरफायदा घेत विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. या संपूर्ण घृणास्पद कृत्यात सचिन मोडक आणि तेजस वालकटे या त्याच्या दोन साथीदारांनी त्याला मदत केली.


आरोपी निघून गेल्यानंतर आणि पती घरी परतल्यावर, घडलेला प्रकार समजताच पीडितेच्या पायाखालची जमीन सरकली. तिने धीर करून कुटुंबीयांना सर्व काही सांगितल्यानंतर तातडीने भिसी पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी भिसी पोलिसांनी ढोंगी महाराजासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार, धमकी आणि संगनमताच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.

महाराज शुभम लटारी खंगार (वय २६, रा. मसाडा, ता. वरोरा) याच्यासह सचिन परमेश्वर मोडक (वय २८, रा. चिखल वानोजा, ता. वरोरा) आणि तेजस गुंडेराव वालकटे (वय २४, रा. उमरेड, जि. नागपूर) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून भिसी पोलिसांनी आरोपी शुभम लटारी खंगार, सचिन परमेश्वर मोडक आणि तेजस गुंडेराव वालकटे या तिघांविरोधात बीएनएच्या कलम ६४ (१), ३५१ (३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मंगेश भोंगाळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक किशोर मुळे करत आहेत.