चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात एका महिलेची गळा दाबून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संतोष साखरकर असे आरोपीचे नाव असून, त्याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष साखरकर याचे ४५ वर्षीय महिलेसोबत मागील तीन ते चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या वादातून आरोपीने महिलेचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह हिंगणा, जिल्हा नागपूर येथे नेऊन पुरल्याचे तपासात उघड झाले.
१७ ऑक्टोबर रोजी आरोपी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी हिंगणा येथे जाऊन कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या उपस्थितीत मृतदेहाचे उत्खनन केले. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अर्थात बीएनएसच्या कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सहारे यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली.

