Bhandara News: अर्ध्यावर मोडला संसार, कामासाठी गावी आले अन् घात झाला; नवदाम्पत्याचा कालव्यात बुडून मृत्यू

Bhairav Diwase

भंडारा:-
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोरंभी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. इथं अलीकडेच लग्न झालेल्या नव दाम्पत्याचा गोसेखुर्द कालव्यात बुडून अंत झाला. रविवारी घडलेल्या या भीषण दुर्घटनेनंतर तब्बल १८ तास चाललेल्या शोधमोहिमेनंतर सोमवारी दोघांचेही मृतदेह शोधण्यात यश आलं.


सोमवारी (१२ ऑक्टोबर) सायंकाळी शोकाकुल वातावरणात कोरंभी येथील स्मशानभूमीत या दाम्पत्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


वडिलोपार्जित शेत पाहताना काळाचा घाला

स्वप्निल अशोक बनकर (वय २९) आणि त्यांची पत्नी प्रज्ञा स्वप्निल बनकर (वय २६) हे दोघे काही कामाच्या निमित्ताने दोन दिवसांपूर्वीच पवनी तालुक्यातील कोरंभी येथील आपल्या स्वगावी आले होते. रविवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास दोघेही आपले वडिलोपार्जित शेत पाहण्यासाठी गेले होते.


शेतात काम करताना पायाला चिखल लागल्यामुळे दोघेही गोसेखुर्द उजव्या कालव्यात पाय धुण्यासाठी खाली उतरले. मात्र, दुर्दैवाने अचानक पाय घसरल्याने दोघेही कालव्याच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यात ओढले गेले आणि बुडाले.


१८ तासांची अथक शोधमोहीम

घटनेची माहिती मिळताच पवनी पोलीस ठाण्याचे पथक, स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. कालव्यात ४ मीटरपेक्षा जास्त पाणी आणि रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत होते. रविवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास प्रज्ञा बनकर यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. मात्र, स्वप्निल यांचा शोध लागू शकला नव्हता.

सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात आले आणि दुपारी १२ वाजताच्या सुमारास स्वप्निल यांचाही मृतदेह सापडला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पवनी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता कोरंभी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.