KVRR कामगारांच्या वेतन प्रश्नावर मानवाधिकार संरक्षण संघटनेचा आवाज

Bhairav Diwase
जिल्हाध्यक्ष पवन वाघमारे यांनी कंपनीला दिली भेट!

चंद्रपूर:- KVRR कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या वेतन आणि सेवा-सुविधांच्या प्रश्नावरून मानवाधिकार संरक्षण संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कामगारांच्या तक्रारींची दखल घेत संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पवन वाघमारे यांनी थेट कंपनीला भेट दिली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे.


चंद्रपूर येथील KVRR कंपनीतील कामगारांनी त्यांच्या विविध अटी आणि वेतनासंदर्भातील समस्या 'मानवाधिकार संरक्षण संघटना, ऑल इंडिया'च्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षांकडे मांडल्या होत्या. कामगारांच्या प्रमुख तक्रारींमध्ये लागू असलेल्या नियमांनुसार पगार न देणे, मनमानी पद्धतीने वेतन वाटप करणे, कायदेशीर हक्कांच्या सेवा-सुविधांपासून वंचित ठेवणे आणि व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा समावेश होता.
या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाध्यक्ष पवन वाघमारे यांनी तातडीने KVRR कंपनीला प्रत्यक्ष भेट दिली.


 यावेळी त्यांनी प्रथम कामगारांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. कामगारांना त्यांच्या कायदेशीर हक्कानुसार व नियमांनुसार वेतन मिळावे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून तीव्र पाठपुरावा केला जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. याविषयी बोलताना जिल्हाध्यक्ष पवन वाघमारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली...


 “कामगारांच्या हक्कांवर अन्याय होत असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. त्यामुळे संबंधित कामगारांच्या समस्या कंपनी व्यवस्थापनासमोर मांडून नियमांनुसार त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कायदेशीर व लोकशाही मार्गाने पाठपुरावा करू.”


कंपनी व्यवस्थापनाने या प्रकरणात योग्य तोडगा काढून सर्व कामगारांना त्यांच्या हक्कानुसार वेतन व सुविधा कराव्यात, अशी ठाम मागणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कामगारांच्या या लढ्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, कंपनी प्रशासन यावर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.