गडचिरोली:- पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या सात होतकरू तरुणींना विश्वासात घेऊन, त्यांच्या नावावर बँक खाती उघडायला लावली आणि त्या माध्यमातून तब्बल १ कोटी ४ लाख ५२ हजार रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे, या खात्यांचा वापर नेमका कशासाठी केला जात आहे, याची साधी कल्पनाही या तरुणींना नव्हती. सध्या सुरू असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमेदरम्यान ‘म्यूल अकाउंट’ (Mule Account) बाबत माहिती मिळाल्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला, ज्यानंतर तरुणींनी थेट पोलिसांत धाव घेतली.
घटना कशी घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२६ मध्ये केदारनाथ सहलीदरम्यान धानोरा तालुक्यातील एका तरुणीची ओळख जुही विनायक मेश्राम हिच्यासोबत झाली होती. पुढे मैत्री वाढल्यावर जुहीने इतर तरुणींशीही ओळख वाढवली. यादरम्यान, २० ऑगस्ट रोजी गडचिरोलीतील एका हॉटेलमध्ये तिने आपले बँक खाते ‘होल्ड’ झाल्याचे सांगत, ट्रेडिंगसाठी नवीन खाती उघडण्याची विनंती केली. मैत्रीच्या आणि विश्वासावर तरुणींनी नवीन सिमकार्ड घेऊन महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आपली खाती उघडली.
कुठून फुटले बिंग?
६ ऑक्टोबर रोजी धानोरा तालुक्यातील एका तरुणीच्या घरी तब्बल २० लाखांहून अधिक रकमेच्या व्यवहारांची बँकेची नोटीस आल्यावर एकच खाडाखोड समोर आली. मैत्रिणींनी इतर खात्यांची तपासणी केली असता, त्यातून लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. सातही खात्या मिळून एकूण १ कोटी ४ लाख ५२ हजार ९९१ रुपयांची उलाढाल झाली होती.
पोलीसांची कारवाई:
याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी जुही विनायक मेश्राम (वय २३, रा. गडचिरोली) आणि तिचा साथीदार सात्विक दीपक सावडीया (वय २२, रा. रायगड, छत्तीसगड) यांना बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सायबर फ्रॉडच्या या वाढत्या जाळ्यामुळे जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू असून, तरुणांनी अशा भ्रामक प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

