चंद्रपूर:- गेल्या ७० वर्षांपासून सातत्याने जमीन कसत असतानाही, वनहक्काचे दावे अद्याप मंजूर न झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आपल्या हक्काच्या जमिनीचे वनहक्क पट्टे तात्काळ मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी २ सप्टेंबरपासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.
वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील मुधोली, घोसरी, काटवल, सोनेगाव, कोकेवाडा, अर्जुनी आणि खुटवंडा या सात गावांमधील जबरंजोत शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पिढ्यान् पिढ्या कसूनही शेतजमिनीचे कायदेशीर हक्क मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आणि नाराजी पसरली आहे.
दरम्यान, आंदोलनाची गांभीर्यता पाहता स्थानिक आमदार करण देवतळे यांनी आंदोलनाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांसोबत यावर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या वनहक्काच्या या प्रलंबित प्रश्नावर लवकरच ठोस उपाययोजना काढण्यात येईल, असे आश्वासन आमदार देवतळे यांनी यावेळी दिले.
आता प्रशासनाकडून यावर नेमका काय निर्णय घेतला जातो आणि ७० वर्षांपासून रखडलेल्या वनहक्क दाव्यांना प्रत्यक्षात कधी मंजुरी मिळते, याकडे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
यावेळी सुधाकर रोहणकर सरपंच भटाळी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे, मारोती गायकवाड, देवानंद जांभुळे, मोतीराम शेंडे, युवराज भाऊ इंगले, मारोती चौधरी, कवडू निकसर, चॅम्पत चौधरी, देविदास गुरुनुले,, सौं, चंद्रकला पेंदाम, ताराबाई चौधरी, निरंजना मडावी, मधुकर पाईकार, माणिक दाते, व सात गावातील शेतकरी उपस्थित होते.
