Ballarpur News: गुप्तधनासासाठी अघोरी पूजा; मांत्रिकासह नऊ जणांना अटक!

Bhairav Diwase

बल्लारपूर:- गुप्तधन मिळवण्याच्या अंधश्रद्धेतून मध्यरात्री निर्जन शिवारात अघोरी पूजा आणि विधी करणाऱ्या एका ९ जणांच्या टोळीचा बल्लारपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका महिलेसह मांत्रिकासह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.


कोलगाव-विसापूर मार्गालगत एका चारचाकी वाहनात काही संशयित व्यक्ती फिरत असल्याची गोपनिय माहिती मध्यरात्री विसापूर पोलीस चौकीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित वाहनाची झडती घेतली. चौकशीदरम्यान संशय बळावल्याने पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.


पोलिसांच्या चौकशीमध्ये या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार देवागन सहारे असल्याचे समोर आले. त्यानेच या सर्व जणांना एकत्र जमवले होते. रामपूर येथील शांताराम हिंगणे याच्या शेतात गुप्तधन पुरलेले आहे, असा दावा करून श्यामराव आत्राम या मांत्रिकाच्या मदतीने अघोरी विधी करण्याची त्यांची तयारी सुरू होती. या विधीसाठी जमिनीत खड्डा खोदणे आणि पूजा साहित्य गोळा करण्याची जबाबदारी इतर सदस्यांवर सोपवण्यात आली होती.


पोलिसांनी या प्रकरणी अंधश्रद्धा व अघोरी प्रथेविरोधात कठोर पावले उचलत 'महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार' गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून फरार संशयिताचा शोध घेतला जात आहे.