चंद्रपूर:- महाराष्ट्राचे ‘ब्लॅक गोल्ड सिटी’ म्हणून ओळखले जाणारे चंद्रपूर शहर सध्या एका वेगळ्याच आणि गंभीर समस्येचा सामना करत आहे. शहराच्या मुख्य मार्गांवरून जाताना एक विदारक आणि तितकेच चिंताजनक चित्र सतत डोळ्यांसमोर येते, ते म्हणजे अल्पवयीन मुलांच्या हातात असलेली दुचाकीचे हँडल....! कायद्यानुसार ज्या मुलांना वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्याचे वय सुद्धा झालेले नाही, ती मुले आज भरधाव वेगाने गाड्या पळवताना दिसत आहेत.
मुजोरी आणि नियमांची पायमल्ली:
चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ते जणू काही रेसट्रॅक बनले आहेत. गांधी चौक, जटपुरा गेट, बंगाली कॅम्प असो वा गिरनार चौक— प्रत्येक प्रमुख मार्गावर शाळकरी व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी विनापरवाना व भरधाव वेगात गाड्या चालवताना दिसतात. एवढेच नव्हे तर, एकाच दुचाकीवर तीन-तीन जण बसून स्टंट करणे, ट्रिपल सीट प्रवासाचा आनंद घेणे आणि वाहतूक नियमांची अक्षरशः पायमल्ली करणे हा जणू त्यांचा शिरस्ताच बनला आहे. विशेष म्हणजे, वाहतूक नियंत्रण शाखेच्या डोळ्यांसमोरून ही मुले सुसाट निघून जातात, तरीही त्यांच्यामध्ये पोलिसांच्या कारवाईची कोणतीही भीती असल्याचे दिसत नाही.
पालकांची भूमिका आणि बेजबाबदारपणा:
या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे पालकांच्या भूमिकेचा. मूल हट्ट करतो म्हणून किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी सोयीचे पडेल या कारणातून अनेक पालक स्वतःहून आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकीची चावी सुपूर्द करत आहेत. मुलांच्या या चुकीच्या हट्टापोटी पालक स्वतः त्यांच्या जीवाशी खेळत आहेत याची जाणीव त्यांना राहिलेली नाही. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुद्धा अनेक अल्पवयीन मुले रोज गाड्या घेऊन जाताना दिसतात, परंतु शाळा प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
प्रशासन व वाहतूक शाखेची कारवाई:
वाहतूक नियंत्रण शाखेने वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून विनापरवाना व अल्पवयीन चालकांवर दंडाची कारवाई केली आहे. पोलिसांकडून पालकांना वाहतूक नियंत्रण शाखेत बोलावून समज दिली जाते आणि दंडही वसूल केला जातो. मात्र, ही कारवाई काही दिवसांनी थंडावते आणि पुन्हा तीच मुले रस्त्यांवर धूम ठोकत असल्याचे चित्र पाहायला मिळते. केवळ आर्थिक दंड आकारून हा प्रश्न सुटणारा नाही, तर यासाठी पालकांमध्ये जनजागृती आणि तितकीच कडक कायदेशीर पावले उचलण्याची गरज आहे.
तरुण मुलांना वेळेत आवर घालण्याची गरज:
रस्त्यावर घडणारा एखादा भीषण अपघातच आपल्याला या गंभीर वास्तवाची जाणीव करून देतो, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. उद्याची पिढी असलेल्या या तरुण मुलांना वेळेत आवर घालण्याची गरज आहे. वाहतूक पोलिसांनी केवळ औपचारिकता न दाखवता यावर कडक कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे, तसेच पालकांनीही स्वतःहून सुज्ञपणा दाखवून आपल्या अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास देऊ नये. कारण, मुलांचे प्राण वाचवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर सर्वात आधी पालकांची जबाबदारी आहे.

