Pombhurna News: अनुदानासाठी थेट ट्रॅक्टर नेला कृषी कार्यालयात!

Bhairav Diwase
पोंभुर्ण्यात शेतकऱ्याची आक्रमक भूमिका
पोंभुर्णा:- राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना सन २०२५-२६ अंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करूनही अद्याप अनुदानाची रक्कम प्राप्त न झाल्याने चेकठाणेवासना येथील लाभार्थी सुषमा गुरुदेव पिंपळशेडे यांनी आपला ट्रॅक्टर थेट पोंभुर्णा येथील तालुका कृषी कार्यालयात आणून ठेवला आहे. अनुदान मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.


राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यानुसार सुषमा गुरुदेव पिंपळशेडे यांनी ट्रॅक्टर खरेदी केला. योजनेअंतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून अनुदानाच्या प्रतीक्षेत असतानाही अद्याप त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही.अनुदानाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम मिळत नसल्याने अखेर त्यांनी आपला ट्रॅक्टर पोंभुर्णा येथील तालुका कृषी कार्यालयात आणून उभा केला आहे. त्यामुळे या प्रकाराची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.


लाभार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुका कृषी अधिकारी स्वाती एम. ढोबळे यांच्याकडे लाभार्थ्यांनी विचारणा केली असता, राज्यभरातच या योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत जिल्हा कृषी कार्यालय आणि तालुका कृषी कार्यालयाकडेही निधी उपलब्ध झालेला नाही, अशी माहिती त्यांनी दिल्याचे समजते. निधी उपलब्ध झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येईल, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केलेली असताना अनुदान रखडल्याने त्यांच्यावर आर्थिक भार पडत आहे. शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचा पैसा खर्च करून ट्रॅक्टर खरेदी केला, मात्र निधी उपलब्ध नसल्यामुळे अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शासनाने राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी तातडीने निधी उपलब्ध करून पोंभुर्ण्यासह जिल्ह्यातील प्रलंबित लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ वितरित करावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

सबंधित योजनेचा निधी उपलब्ध नाही. जिल्हा कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी केलेली आहे. निधी उपलब्ध होताच लाभार्थ्यांना वितरित केल्या जाईल. 
स्वाती ढोबळे, 
तालुका कृषी अधिकारी, पोंभूर्णा.