Chandrapur News: वडा खाताना शिंक आली अन् महिलेचा जीव गेला!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
तान्हा पोळ्याचा सण, घरात आनंदाचे वातावरण... मात्र, हस्तकला गणवीर सणासाठी बनवलेला वडा खाताना आलेल्या एका शिंकेने हसत्या-खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. वड्याचे बारीक कण थेट फुफ्फुसात गेल्याने हस्तकला चेतन गणवीर (वय ३०, रा. सुशी, ता. मूल) या महिलेचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सुशी गावावर शोककळा पसरली असून, अवघ्या पाच महिन्यांच्या बाळाच्या डोक्यावरून मायेचे छत्र कायमचे हरपले आहे. 


हस्तकला गणवीर या स्वतःच्या घरी बेडवर बसून वडे खात असताना अचानक आलेल्या शिंकेमुळे अन्नाचे बारीक कण श्वसनमार्गातून फुफ्फुसात गेले आणि त्या जागीच बेशुद्ध पडल्या. कुटुंबीयांनी पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारांनंतर त्यांना शुद्ध आली. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने चंद्रपुरात हलवण्याचा सल्ला दिला.


 मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या निधनाची जाणही नसलेल्या निष्पाप चिमुकल्याचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. हस्तकला गणवीर या 'उमेद' अभियानांतर्गत बचत गट प्रवर्तक म्हणून कार्यरत होत्या. आपल्या उत्कृष्ट कार्याने त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पती, पाच महिन्यांचे बाळ आणि सासू असा परिवार आहे.