Chandrapur political News: वडेट्टीवारांच्या होमपिचवर भाजपच्या दहीहंडीत खासदार धानोरकरांची हजेरी

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत असताना, आता यात एक मोठा ट्विस्ट आला आहे. वडेट्टीवारांच्या होमपिचवर जाऊन एका मोठ्या कार्यक्रमात हजेरी लावत खासदार महोदयांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. गेल्या काही महिन्यांत चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणामुळे या वैमनस्याला नवे धुमारे फुटले. त्यातच आता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येत नसलेल्या, मात्र विजय वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्या असणाऱ्या ब्रह्मपुरी मतदारसंघात हजेरी लावली.


विशेष म्हणजे, हा दहीहंडीचा कार्यक्रम काँग्रेसने नाही तर भाजप नेत्यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजप आमदार बंटी भांगडिया, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर आणि माजी उपाध्यक्ष कृष्णा सहारे यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.


या दहीहंडी महोत्सवात भाजप नेत्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी तर आपल्या भाषणात, अप्रत्यक्षपणे प्रतिभा धानोरकर आपल्या सोबत असल्याचा दावा करत त्यांच्या मदतीने विजय वडेट्टीवार यांना धोबीपछाड देऊ, अशी खुली घोषणाच करून टाकली.


या सर्व राजकीय घडामोडींवर स्पष्टीकरण देताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी, "मी चंद्रपूर जिल्ह्याची खासदार आहे आणि ब्रह्मपुरीमधून मला सातत्याने निमंत्रणे येत होती, म्हणूनच मी या सार्वजनिक दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती लावली," असे स्पष्ट केले. दुसरीकडे, आमदार विजय वडेट्टीवार यांनी मात्र या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, "भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोणी जात असेल तर मला त्यावर काहीही बोलायचं नाही," असे म्हणत अधिक भाष्य करण्याचे टाळले.


यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरीतील एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भूमिका घेत राजकीय वातावरण तापवले होते. त्यातच अलीकडे चंद्रपूर महानगरपालिकेत आणि स्थानिक राजकारणात होणारी विरोधी नेत्यांची जवळीक पाहता, आगामी काळात चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.