Chandrapur News: स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कासाठी चंद्रपुरात आज महामोर्चा!

Bhairav Diwase
उद्योगमंत्र्याकडून महामोर्चाची दखल; आज स्वतः येणार चंद्रपूरात 
चंद्रपूर:- "आमचा जिल्हा, आमचा रोजगार" या ज्वलंत भूमिकेवरून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आज चंद्रपुरात एक मोठा लढा उभारण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व कंपन्या, उद्योग, कारखाने आणि प्रकल्पांमध्ये स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये सरसकट ८० टक्के आरक्षण त्वरित लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक लोकाधिकार सेनेच्या (शिवसेना) वतीने आज चंद्रपुरात एका भव्य रोजगार हक्क महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.


चंद्रपूर-गडचिरोली स्थानिय लोकाधिकार सेनेच्या अध्यक्षा गोमती पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या महामोर्चाला शिवसेना स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष गजानन किर्तीकर हे देखील विशेष उपस्थिती दर्शवणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिका पटांगण (गांधी चौक) येथून या महामोर्चाची सुरुवात होऊन तो थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी, विविध प्रकल्पांमधील कामगार आणि नागरिकांनी आपल्या हक्काच्या रोजगारासाठी या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.


उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत घेणार आंदोलनाची दखल

या भव्य महामोर्चाची गंभीर दखल घेत राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्वतः आज चंद्रपूरचा दौरा आयोजित केला आहे. विशेष म्हणजे, ते या मोर्चाच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून आंदोलकांशी संवाद साधणार आहेत. या महामोर्चाच्या माध्यमातून भूमिपुत्रांच्या रोजगारासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन स्वतः उद्योगमंत्री स्वीकारणार असल्याच्या माहितीमुळे या आंदोलनाला राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.
उद्योगमंत्र्यांच्या या थेट उपस्थितीमुळे स्थानिक तरुणांच्या ८० टक्के आरक्षणाच्या मागणीला यश मिळणार का, याकडे आता संपूर्ण चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.