चंद्रपूर:- राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ च्या औचित्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक संचालनालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "विकसित भारत युवा कनेक्ट - नॅशनल स्पोर्ट्स डे २०२६" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आभासी (Virtual) पद्धतीने थेट संवाद साधतील.
हा विशेष कार्यक्रम २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता महाविद्यालयाच्या 'अब्दुल शफी सभागृहात' पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण संवादासाठी गोंडवाना विद्यापीठ आणि एन.एस.एस. प्रादेशिक संचालनालयाने सरदार पटेल महाविद्यालयाची निवड केली आहे. या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर यांनी विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना थेट देशाच्या पंतप्रधानांशी संवाद साधण्याची ही एक दुर्मिळ संधी मिळाली आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता अब्दुल शफी सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर
