Murder News : शेतात आढळला २८ वर्षीय युवकाचा मृतदेह!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आसी येथील शेतात २८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश प्रदीप काळे असे मृत युवकाचे नाव असून, या प्रकरणी हत्येच्या संशयावरून पोलिसांनी एका ३६ वर्षीय शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे. शेतीच्या कामावर येण्याच्या कारणावरून मृतक आणि संशयितामध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जुन्या वादातून ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.


वरोरा तालुक्यातील आसी येथील गणेश प्रदीप काळे हा बुधवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजताच्या सुमारास शौचास जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मात्र, रात्र उलटूनही तो घरी परतला नाही. सकाळपर्यंत कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, काहीच माहिती मिळत नसल्याने अखेर वडिलांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, गुरुवारी सकाळी आसी येथील धनराज आसेकर यांच्या शेतात गणेश काळे याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मृतक गणेश काळे आणि संशयित शेतकरी गणेश नागोराव बाहुरे यांच्यात शेतीच्या कामावर येण्याच्या कारणावरून वाद झाल्याची चर्चा आहे. या जुन्या वादातूनच हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, संशयित गणेश बाहुरे याला ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली खनके पुढील तपास करीत आहेत. मात्र, युवकाच्या मृत्यूमागील नेमके कारण काय? हत्या नेमकी कशी झाली? याचा उलगडा पोलिस तपासानंतरच होणार आहे.