चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरासमोरील उघड्या पाण्याच्या टाक्यात पडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा अंधारात पाच फूट खोल टाक्यात तोल जाऊन तो पडला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सागर गुरमीट्टीवार असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने करंजी गावावर शोककळा पसरली आहे.
गोंडपीपरी तालुक्यातील करंजी गावात ही दुर्दैवी घटना घडली. सागर गुरमीट्टीवार (वय २६) हे रात्री झोपेतून उठून लघुशंकेसाठी घराबाहेर गेले होते. मात्र, घरासमोरच असलेल्या उघड्या पाण्याच्या टाकीचा अंधारात अंदाज न आल्याने ते सुमारे पाच फूट खोल टाक्यात कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे, सागर यांनी अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच आपल्या नव्या घराचे बांधकाम पूर्ण केले होते. नव्या घरात सुखाचा संसार थाटण्याची स्वप्ने त्यांनी पाहिली होती. मात्र, याच घरासमोरील उघड्या पाण्याच्या टाक्याने त्यांच्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट केला.
या घटनेमुळे गुरमीट्टीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्ता पुरुष हरपल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले असून संपूर्ण करंजी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

