Accident News : राजुरा-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू!

Bhairav Diwase
कोरपना:- राजुरा-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोजीरोटीसाठी घराबाहेर पडलेल्या दोन तरुणांवर काळाने घाला घातल्याने नारंडा आणि सोनुर्ली परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, मृत तरुणांच्या कुटुंबीयांना विद्या इन्फ्राबिल्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून प्रत्येकी सात लाख रुपये, अशी एकूण १४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मान्य करण्यात आले आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर-कोरपना मार्गावरील एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे नऊ वाजताच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांना मागून आलेल्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण दुर्घटनेत स्वप्नील सूर्यभान चामाटे (वय २३, रा. नारंडा) आणि तुषार विठोबा वैरागडे (वय २४, रा. सोनुर्ली) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या २३ आणि २४ वर्षांच्या या तरुणांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मजुरी करणाऱ्या या दोन्ही तरुणांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधारच हरपला आहे.


मृतांच्या कुटुंबीयांना १४ लाखांची आर्थिक मदत

दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा यासाठी २७ नोव्हेंबर रोजी विद्या इन्फ्राबिल्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी राकेश संजय विश्वास आणि कुटुंबीयांच्या प्रतिनिधींमध्ये लेखी समझोता करण्यात आला. या समझोत्यानुसार दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी सात लाख रुपये, अशी एकूण १४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

यापैकी प्रत्येकी तीन लाख ५० हजार रुपये, असे एकूण सात लाख रुपये आज अदा करण्यात आले आहेत. तर उर्वरित प्रत्येकी तीन लाख ५० हजार रुपये १५ ते २० डिसेंबरदरम्यान धनादेशाद्वारे देण्यात येणार आहेत.

यावेळी भाजपा तालुका महामंत्री सतीश उपलांचेवार, भाजपा गटनेते तथा नगरसेवक सतीश बेतावार, समाजसेवक मनोज भोजेकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री आशिष ताजने, सोनुर्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अंकित लोढे, धम्मकीर्ती कापसे तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे नातेवाईक उपस्थित होते.