पोंभुर्णा:- वाळू घाटातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतोय, मात्र याच वाळूच्या वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. थेरगाव ते चेक कोसंबी क्रमांक १ या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मनीष यशवंत राऊत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पोंभुर्णा तहसीलदारांना निवेदन सादर केले असून, मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तहसील अंतर्गत येणाऱ्या थेरगाव ग्रामपंचायतीच्या चेक कोसंबी क्रमांक १ येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. गावातील वाळू घाटातून दरवर्षी शासनाला रॉयल्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र, या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर आणि हायवा यांसारख्या जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे थेरगाव ते चेक कोसंबी क्रमांक १ हा सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा पोहोच रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्यावरील खडीही उखडून बाहेर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तसेच वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीतून शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळत असताना दुसरीकडे गावातील मूलभूत रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. ही बाब अत्यंत खेदजनक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे खनिज विकास निधी अर्थात डीएमएफ किंवा वाळू महसुलातील ग्रामपंचायतीच्या हिस्स्यातून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती अथवा डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते मनीष यशवंत राऊत यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना हे निवेदन सादर करण्यात आले. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अन्यथा ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
आता ग्रामस्थांच्या या मागणीची प्रशासन कितपत दखल घेते आणि थेरगाव ते चेक कोसंबी क्रमांक १ रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न कधी मार्गी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
