चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात झालेल्या गोळीबारातील हत्येच्या घटनेनंतर आज तीव्र संतापाची लाट उसळली असून शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हत्येमागील मुख्य सूत्रधार आणि कट रचणाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी राजुरा पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. यावेळी जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वाढता तणाव आणि गर्दी अनियंत्रित होत असल्याचे पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. याच दरम्यान संतप्त जमावातील काही जणांनी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (SDPO) वाहनाच्या गाडीची काच फोडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून राजुरा शहरात अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली असून मुख्य चौकांमध्ये आणि संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

