चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून आत्महत्येच्या आणि संशयास्पद मृत्यूच्या चार वेगवेगळ्या धक्कादायक घटना समोर आल्या असून संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. तळोधी, मांगलगाव, नांदेड आणि वंधली या ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे ग्रामीण भागात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
तळोधी येथे नृत्य कलावंताचा संशयास्पद मृत्यू:
तळोधी (बा.) येथील वॉर्ड क्रमांक ७ मधील रहिवासी असलेला १९ वर्षीय नृत्य कलावंत राहुल विजय मेश्राम याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सेवा सहकारी सोसायटीमागील एका शेतातील कडुनिंबाच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला. राहुल अत्यंत गरीब कुटुंबातील असून मोलमजुरी करून कुटुंबाला मदत करायचा. पोलिसांच्या प्राथमिक पंचनाम्यात मृतदेहाचे पाय जमिनीला टेकलेले असणे, नाकातून रक्त येणे आणि पाठीवर व पायावर रक्ताचे डाग असणे या बाबी समोर आल्या आहेत. यामुळे ही आत्महत्या नसून घातपात असावा, असा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.
चिमुकलीच्या जन्मानंतर दीड महिन्यातच वडिलांची आत्महत्या:
चिमूर तालुक्यातील भिसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांगलगाव येथे ४२ वर्षीय शेतमजूर सुखदेव सोनटक्के यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. दीड महिन्यांपूर्वीच त्यांना मुलगी झाली होती. पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली असल्याने ते घरी आई व ३ वर्षांच्या मुलासह राहत होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांनी छताला गळफास लावला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
नागभीड तालुक्यात विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल:
नागभीड तालुक्यातील नांदेड येथे गुरुवारी पहाटे आबिदा अब्बास शेख (वय ४३) या विवाहित महिलेने घरातील खिडकीला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसिक अस्वस्थतेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून नागभीड पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
वरोरा तालुक्यात १८ वर्षीय तरुणाने संपवली जीवनयात्रा:
वरोरा जवळील वंधली येथे साहिल हनुमान कन्नाके (वय १८) या तरुणाने घरातील सदस्यांचे दुर्लक्ष असताना अवघ्या १५ मिनिटांच्या कालावधीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. तो शेतात फवारणीसाठी जाण्याच्या तयारीत होता आणि गेल्या चार दिवसांपासून तणावात असल्याचे समजते.
या चारही प्रकरणांत संबंधित स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
