नागभीड:- अंधश्रद्धा आणि संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने एकाच कुटुंबातील चार जणांवर काठ्या आणि विटांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथे घडली आहे. “तुमच्या जादूटोण्यामुळेच माझ्या पत्नीची आणि सुनेची प्रकृती बिघडते” असा अजब संशय घेत आरोपींनी हे कृत्य केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागभीड पोलिसांनी सात जणांविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
नेमके काय घडले?
पाहार्णी येथील रहिवासी सुमित्रा सेलोकर, त्यांचे पती सुकाजी, मुलगा किशोर आणि सून सुनिता हे सर्वजण घरात असताना अचानक आरोपी रवींद्र भाजीपाले, पवन भाजीपाले, पवनची पत्नी, आई व अन्य तीन साथीदार काठ्या घेऊन त्यांच्या अंगणात घुसले. आरोपींनी “तुम्ही जादूटोणा केल्यामुळेच आमच्या सुनेने विष प्राशन केले” असा बिनबुडाचा आरोप करत सेलोकर कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
काठ्यांनी वार आणि कपाळावर विटेने प्रहार:
वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी सुमित्रा आणि सुकाजी सेलोकर यांच्या डोक्यावर व खांद्यावर काठ्यांनी सपासप वार केले. भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या सून सुनीता यांनाही आरोपींनी अमानुष मारहाण केली. तर मुलगा किशोर याला आरोपींनी धरून ठेवले आणि पवन भाजीपाले याने त्याच्या कपाळावर विटेने जोरदार प्रहार केला.
जीव वाचवण्यासाठी पीडित कुटुंब घरात पळाले, मात्र आरोपींनी घरात घुसूनही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून नागभीड पोलीस ठाण्यात ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
