चिमूर:- चिमूर क्रांती दिनाचे औचित्य साधून हुतात्म्यांना आणि शहिदांना अभिवादन करण्यासाठी चिमूर शहरात आलेले चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र आंदोलनाचा सामना करावा लागला.
शहिदांना अभिवादन करून पालकमंत्री बाहेर पडत असतानाच काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवून धरला. चिमूर शहर व तालुक्यातील विविध प्रलंबित समस्या आणि नागरिकांच्या मागण्यांसंदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन द्यायचे होते. मात्र, निवेदन स्वीकारण्यासाठी ताफा थांबवण्याच्या प्रयत्नात कार्यकर्त्यांनी थेट गाड्यांसमोर येत घोषणाबाजी सुरू केली.
ताफा अडवल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी केली. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताफ्यापासून बाजूला केले आणि मार्ग मोकळा करून दिला, त्यानंतर पालकमंत्र्यांचा ताफा पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाला.

