Korpana Police: बॅरिकेड्स तोडून पळणारे आईचर वाहन पकडले!

Bhairav Diwase
१८ लाखांच्या मुद्देमालासह २० गोवंश मुक्त!
कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. १६ ऑगस्ट २०२६ रोजी मेहंदी फाट्या जवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. दरम्यान, गडचांदूर मार्गाकडून येणाऱ्या एका संशयित आईचर वाहनाला (MH 34 BG 9203) थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने बॅरिकेड्स तोडून पळ काढला.


पोलीस पथकाने सिनेमॅटिक पद्धतीने वाहनाचा पाठलाग करून त्याला रोखले. मात्र, चालक वाहन चालू स्थितीत सोडून फरार झाला. वाहनाची पाहणी केली असता त्यात २० गोवंशीय बैल अत्यंत निर्दयीपणे, तोंडाला व पायांना दोरीने बांधून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे उघडकीस आले.


कारवाईतील जप्त मुद्देमाल:
२० गोवंशीय बैल: अंदाजे किंमत ₹ ३,००,०००/-

आईचर वाहन (MH 34 BG 9203): अंदाजे किंमत ₹ १५,००,०००/-
 
एकूण जप्त मुद्देमाल: ₹ १८,००,०००/-


फरार चालकावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा आणि मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व गोवंशाची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार लता वाढीवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.