Soldier martyred: मारईपाटणच्या शहीद जवानांच्या बलिदानामुळेच चंद्रपूर नक्षलमुक्त!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- सुरक्षा दलांचे यशस्वी नक्षलविरोधी अभियान आणि स्थानिक पातळीवर शासनाने राबविलेल्या विविध विकास योजनांमुळे चंद्रपूर जिल्हा सन २०२२ पासून केंद्रिय गृह मंत्रालय व राज्य शासनाकडून नक्षलमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. आज जिल्ह्यात निर्माण झालेली शांतता, सुरक्षितता व विकासाची वाटचाल ही केवळ वर्तमानातील उपलब्धी नसून, त्यामागे अनेक वर्षे दुर्गम व नक्षलग्रस्त भागात प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या असंख्य वीर पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या अतुलनीय त्यागाची व बलिदानाची प्रेरणादायी गाथा आहे.


पोलीस स्टेशन टेकामांडवा हद्दीतील मौजा माईपाटण गावालगत १० ऑगस्ट १९८९ रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भयंकर बॉम्बस्फोटाच्या घटनेत वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद पोलिसांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १० ऑगस्ट २०२६ रोजी भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली व अभिवादन करण्यात आले.


मातृभूमीसाठी प्राणाची आहुती देणारे अमर शहीद जव्‍हान:

एच. एस. भोसले (पोलीस उपनिरीक्षक),

ए. एस. परब (पोलीस शिपाई /568)

एस. डी. शेरे (पोलीस शिपाई/809)

व्ही. डी. तांबडे (पोलीस शिपाई / 896)

बी. एस. जाधव (पोलीस शिपाई /746)

एस. जी. सपकाळ (पोलीस शिपाई / 1030)

के. व्ही. रसाळ (प्रशिक्षक) सर्व नेमणून एसआरपीएफ गट २

डी. एन. हजारे (चालक पोलीस शिपाई/888) नेमणूक नागपूर रेल्वे


ज्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही. रक्ताचे थेंब सांडून ज्यांनी शांततेचे बीज रोवले, त्या वीरांच्या बलिदानाने आज चंद्रपूरच्या भूमीला सुरक्षितता व शांततेची नवी ओळख प्राप्त झाली आहे.


प्रतिकूल परिस्थितीत दिलेली सेवा आणि सुरक्षिततेचा पाया:

चंद्रपूर जिल्ह्याच्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागात अनेक वर्षे पोलीस दलाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावले. घनदाट जंगल, दुर्गम भौगोलिक परिस्थिती, अपुऱ्या सुविधा आणि नक्षलवादाचा धोका यांची पर्वा न करता पोलीस अधिकारी व अंमलदारांनी जनतेच्या जीविताची व मालमत्तेची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले.


या संघर्षात अनेक पोलीस जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळेच आजच्या पिढीला सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता आले, विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होता आले आणि लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ झाला.


अभिवादन सोहळा व जनजागरण मेळावा:

आयुष नोपानी (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली मारईपाटण येथे आयोजित अभिवादन सोहळ्यास ईश्वर कातकडे (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) व रविंद्र जाधव (उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थितांनी शहीदांच्या स्मृतीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


कार्यक्रमप्रसंगी आयोजित जनजागरण मेळाव्यात मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी म्हणाले, आज चंद्रपूर जिल्हा नक्षलमुक्त होकर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या शांततामय आणि सुरक्षित वातावरणासाठी अनेक शूर जवानांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांच्या त्यागामुळे आज नागरिकांचे जीवन सुरक्षित झाले असून, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुढे जाण्याची संधी मिळाली आहे. या वीर शहीद पोलिसांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवून शांतता, विकास आणि लोकशाहीच्या मूल्यांना बळकटी देणे होय.


या सोहळ्यास परिसरातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा, आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षक, स्थानिक नागरिक तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद पोलिसांचे बलिदान ही चंद्रपूरच्या शांततेची अमूल्य पायाभरणी असून, त्यांच्या शौर्याची व त्यागाची प्रेरणा भावी पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक राहील.

शहीद अमर राहोत! त्यांचे शौर्य आणि बलिदान चिरंतन स्मरणात राहो!