Pombhurna News: रानडुकराच्या धडकेत चौघे गंभीर जखमी; पोंभुर्णा तालुक्यातील घटना

Bhairav Diwase

पोंभुर्णा:-
पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना गावाजवळ गोंडपिपरी–खेडी मार्गावर रानडुकराने अचानक रस्ता ओलांडल्यामुळे झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसतात संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास भूषण तेजराव ठेंगणे (वय २२, रा. चेकठाणेवासना) आणि लोकेश मनोज निखाडे (वय १६, रा. जैरामपूर) हे दुचाकीने प्रवास करत होते. यादरम्यान अचानक एक रानडुक्कर त्यांच्या वाहनासमोर आले आणि त्याने धडक दिली. याच वेळेस समोरून येणाऱ्या सुभाष लटारू भोयर यांच्या दुसऱ्या वाहनाचीही या वाहनाला धडक बसली.


या दुहेरी अपघातात भूषण ठेंगणे, लोकेश निखाडे, सुभाष लटारू भोयर (वय ३९) आणि प्रतिमा सुभाष भोयर (वय ३१, दोघेही रा. भणार हेटी) हे चौघे जण गंभीर जखमी झाले.


अपघाताची माहिती मिळताच चेकठाणेवासना येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सामाजिक व मानवीय दृष्टिकोनातून पुढाकार घेत जखमींना त्वरित पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, चौघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी 'रेफर' करण्यात आले आहे.


या मार्गावर वारंवार वन्यप्राण्यांचा वावर होत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या या अपघाताची दखल घेत वनविभाग व शासनाने जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलावा आणि नियमानुसार तातडीने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तसेच अशा घटना रोखण्यासाठी संबंधित मार्गावर आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरत आहे.