Pombhurna News : कपडे धुण्यासाठी गेल्या अन् पाय घसरल्याने महिलेचा बुडून मृत्यू

Bhairav Diwase

पोंभुर्णा:-
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी गावालगत असलेल्या कालव्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगला अरुण कानमपेल्लीवार असे मृत महिलेचे नाव आहे.

सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नेहमीप्रमाणे त्या कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या खोल पाण्यात पडल्या.


कालव्याच्या भिंतीला सुरक्षा कठडा नसल्याने आणि भिंती घसरड्या असल्याने त्यांना पाण्याबाहेर येता आले नाही. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे घोसरी गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.