चंद्रपूर:- दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तब्बल १८ लाख रुपयांचे योगदान देण्यात येत आहे.
राज्यात यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा आणि शासनाच्या मदतकार्यात हातभार लागावा, या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर येथील सर्व अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने आपल्या एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी समर्पित केले आहे.
ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करून एकूण १८ लाख १४६ रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. ही संपूर्ण रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात येत आहे.

