या आंदोलनाचे नेतृत्व इंजि. वैभव पिंपळशेंडे करीत आहेत. या आंदोलनात अन्यायग्रस्त ठेवीदारांसह नागरिक तसेच विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी सहभागी होत आहेत.
यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, चंद्रपूर येथील अनेक ठेवीदारांनी आपल्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई विश्वासाने पतसंस्थेत जमा केली होती. मात्र, ठेवींची मुदत पूर्ण होऊनही पैसे परत मिळत नसल्याने ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर ठेवीदारांनी एकत्र येत पोंभुर्णा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
ठेवीदारांच्या सर्व प्रलंबित ठेवी व्याजासह परत कराव्यात, संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि ठेवीदारांच्या पैशांचा पारदर्शक हिशेब सार्वजनिक करावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांकडून करण्यात येत आहेत.
जोपर्यंत ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत आणि मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. हा लढा सर्वसामान्य ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांसाठी असून, प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

