Ballarpur News: प्रसूतीदरम्यान माता व नवजात बालकाचा मृत्यू

Bhairav Diwase

बल्लारपूर:-
येथील डॉ. कल्लूरवार यांच्या रुग्णालयात प्रसूतीदरम्यान एका नवजात बाळ आणि त्याच्या मातेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, कुटुंबीयांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत.

मृतक महिला नीलम कुमारी यांचे पती रणधीर कुमार सिंह हे रेल्वेत लोको पायलट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी नीलम यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर, हलगर्जीपणामुळे बाळ मृत जन्माला आले. त्यानंतर अतिरक्तस्राव होऊन उपचाराअभावी प्रकृती खालावल्याने नीलम यांचाही मृत्यू झाला, असा आरोप पती रणधीर कुमार यांनी केला आहे.

दुसरीकडे, रुग्णालयाच्या डॉ. मंजूषा कल्लूरवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बाळामध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याने चंद्रपूरहून विशेष तज्ज्ञ डॉक्टरांनाही बोलावण्यात आले होते. बाळाच्या गळ्यात नाळ अडकल्याने त्याचा मृत्यू झाला, आणि या दुर्दैवी बातमीचा तीव्र धक्का बसल्यामुळेच मातेची प्रकृती बिघडून तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

याप्रकरणी मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आला असून, अंत्यसंस्कारासाठी तो पाटणा (बिहार) येथे नेला जाणार आहे. बल्लारपूर पोलीस निरीक्षक बिपिन इंगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.