Chandrapur police: गणेश विसर्जनासाठी चंद्रपूर पोलिसांचा राहणार कडेकोट बंदोबस्त

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आगामी गणेश विसर्जनासाठी तब्बल १२० पोलीस अधिकारी आणि १ हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज असणार आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी याबाबत माहिती दिली असून, विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधारित सीसीटीव्ही व्हॅनची मदत घेतली जाणार आहे. या हायटेक व्हॅनच्या माध्यमातून सराईत गुन्हेगार आणि संशयित हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलीससह होमगार्ड तैनात राहणार आहेत. 


याशिवाय, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकही मिरवणूक मार्गावर तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या किंवा अनुचित प्रकारांना तात्काळ आळा घालण्यासाठी महिला पथक विशेष लक्ष ठेवेल.


दरम्यान, गणेश भक्तांनी उत्साहात आणि शांततेत गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावे, मात्र यादरम्यान स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला व पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले आहे.