Pombhurna News : पैशांच्या वादातून मारहाणीचा आरोप; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhairav Diwase

पोंभुर्णा
:- जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील जामतुकूम येथे जुन्या आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादानंतर एका व्यक्तीला मारहाण केल्याची तक्रार पोंभूर्णा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीसह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जामतुकूम येथील सुरेश गणपतराव सातरे (वय ४९) यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात तक्रार दिली. तक्रारीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास सातरे हे गावातील मंदिराजवळील पानठेल्यावर गेले होते. त्यावेळी श्रीकांत कामीडवार तेथे कारने आला.


पूर्वी दिलेल्या पैशांच्या परतफेडीवरून दोघांमध्ये वाद झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या वादादरम्यान श्रीकांत याने शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच, श्रीकांतचे वडील आणि आई यांनीही मारहाण केल्याचा व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोंभूर्णा पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 


या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेश निमगडे करीत आहेत