Murder News: जिल्ह्यात थरारक हत्याकांड! युवकाची धारदार शस्त्राने हत्या

Bhairav Diwase

भद्रावती:-
भद्रावतीमधील गजबजलेल्या भद्रनाग मंदिर चौकात आज सकाळी एका ४० वर्षीय युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.


मृतक युवकाची ओळख ओमदेव भाऊराव मेश्राम (वय ४०, रा. देऊरवाडा, हल्ली मु. शिवाजीनगर, भद्रावती) अशी पटली आहे. प्राप्त माहितीनुसार, ओमदेव मेश्राम हे आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आपल्या मोटारसायकलने कामानिमित्त घरून निघाले होते. ते भद्रनाग मंदिर चौकात पोहोचताच आधीच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने गंभीर वार केले, ज्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.


सकाळच्या वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन खेत्रे यांच्यासह भद्रावती पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून, या थरारक हत्याकांडामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलिसांकडून सुरू आहे.