Chandrapur News: गणेश विसर्जनासाठी इरई धरणातून पाणी सोडण्यास CSTPS चा नकार!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अपुरे राहिल्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या (CSTPS) मालकीच्या इरई धरणातील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, आगामी गणेशोत्सवादरम्यान  इरई धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सीएसटीपीएस प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे.


यंदाच्या मान्सूनमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणांची पाणीपातळी खालावली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणात सध्या केवळ ७१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या उपलब्ध पाण्याचा अतिशय काटकसरीने वापर करावा लागणार असल्याची माहिती सीएसटीपीएसचे मुख्य अभियंता अनिल काथोरे यांनी दिली आहे.


जरी सध्या धरणात असलेला साठा पुढील वर्षीच्या मान्सूनपर्यंत पुरेल असा अंदाज असला, तरी आगामी उन्हाळ्यातील बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी वेगाने घटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पाणी व्यवस्थापन अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे बनले आहे.


दुसरीकडे, सध्या राज्यभरात विजेची मागणी कमालीची वाढल्याने वीज निर्मिती केंद्रांवर अतिरिक्त ताण आला आहे. असे असतानाही वीज निर्मिती सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. इरई नदीपात्रातील सद्यस्थिती आणि पाणीटंचाईची शक्यता पाहता, जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जनासाठी धरणातून पाणी सोडण्याची केलेली मागणी यंदा मान्य करणे अशक्य असल्याचे मुख्य अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जनासाठी धरणाचे पाणी सोडले जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.