चंद्रपूर:- दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर शहरामध्ये श्री गणपती विसर्जन मिरवणूक अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेश मंडळे सहभागी होत असून, देखावे पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेला त्रास होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी मुंबई पोलीस अधिनियम-१९५१ च्या कलम ३३(१)(ब) नुसार वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
हे बदल दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०६:०० वाजल्यापासून ते दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०६:०० वाजेपर्यंत लागू राहतील.
बंद असणारा मुख्य मार्ग:
प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट-कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गे रामनगर रोड मार्गे संत केवलराम चौक- इरई नदी (रामसेतू पूल) हा मुख्य रस्ता मिरवणूक सोहळा संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहील.
पर्यायी वाहतूक मार्ग:
नागपूर ते बल्लारशहा/मूल: नागपूर रोडवरून येणारी वाहने प्रियदर्शनी चौकात न जाता वरोरा नाका उड्डाणपूल - सावरकर चौक ते बंगाली कॅम्प मार्गे जातील.
मूल/बल्लारशहा ते नागपूर: ही वाहने बंगाली कॅम्प - सावरकर चौक - वरोरा नाका नवीन उड्डाणपूल मार्गे जातील.
नागपूरहून शहरात प्रवेश (जड वाहने वगळून): छोटा नागपूर मार्गे दाताळा चौक - देवाळा गाव - चोराळा टी पॉईंटवरून बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेटमधून शहरात प्रवेश करता येईल.
बल्लारशहा व मूलकडून येणारी वाहने (जड वाहने वगळून): बसस्टँड - एलआयसी ऑफिस - बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौक अथवा प्रसन्ना पेट्रोल पंप मार्गे बाबुपेठ होऊन फक्त अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवेश मिळेल.
नो पार्किंग आणि नो हॉॅकर्स झोन (No Parking & No Hawkers Zone)
मिरवणूक मार्गावर खालील परिसर 'नो पार्किंग' आणि 'नो हॉॅकर्स' म्हणून घोषित करण्यात आला आहे:
जटपुरा गेट ते कस्तुरबा चौक / रामसेतू पूल / प्रियदर्शनी चौक
कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट / अंचलेश्वर गेट / जेल रोड चौक
गांधी चौक ते मिलन चौक ते जोड देउळ
दस्तगीर चौक ते मिलन चौक ते बजाज पॉलिटेक्निक कॉलेज
हिंदी सिटी हायस्कूल ते रघुवंशी कॉम्प्लेक्स आणि मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीज / छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदिर
मिरवणूक मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांना स्वतःची पार्किंगची जागा नसल्यास त्यांनी जुबली हायस्कूलचे मैदान किंवा महानगरपालिकेच्या बाजूची पार्किंग वापरावी. मिरवणूक संपल्यानंतरच ती वाहने बाहेर काढता येतील.
नागरिकांसाठी अधिकृत पार्किंग स्थळे
शहरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी खालील ७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे:
१. चांदा क्लब ग्राउंड
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका
३. सेंट मायकल हायस्कूल, नगीना बाग
४. सिंधी पंचायत भवन, संत केवलराम चौक जवळ, रामनगर
५. व्यायाम शाळा ग्राउंड, पठाणपुरा चौक
६. डी.एड. कॉलेज ग्राउंड, बाबुपेठ
७. महाकाली मंदिर ग्राउंड, चंद्रपूर
प्रशासनाने नागरिकांना शहरात वाहने न आणता वरील निर्धारित ठिकाणी पार्क करण्याचे आणि गणेशोत्सवादरम्यान पोलीस प्रशासनाला सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.
