SP college : सरदार पटेल महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियान

Bhairav Diwase
चंद्रपूर:- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार आणि सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’ या उपक्रमाचे आयोजन दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयात करण्यात आले. युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे, व्यसनांपासून दूर राहण्याबाबत जनजागृती करणे तसेच विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची सकारात्मक भूमिका अधोरेखित करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.


कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर होते. प्रमुख अतिथी म्हणून भरोसा सेल तथा दामिनी पथक प्रमुख, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर प्रज्ञा वाडेकर तसेच चंद्रपूर सायबर पोलीस स्टेशनचे सायबर हायजिन प्रॅक्टिसनर श्री. मुजावर अली उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी केले. त्यांनी युवकांमध्ये वाढणाऱ्या विविध प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याची गरज स्पष्ट करताना, निरोगी व सुदृढ युवा पिढी ही विकसित भारताची महत्त्वपूर्ण शक्ती असल्याचे सांगितले. युवकांनी स्वतः व्यसनमुक्त राहून समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.


अध्यक्षीय मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर यांनी युवक हे देशाच्या विकासाचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगितले. व्यसनमुक्त, सशक्त, जबाबदार आणि राष्ट्रहिताची जाणीव असलेली युवा पिढी घडविणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच आपल्या मित्र-मैत्रिणी व समाजामध्येही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रज्ञा वाडेकर यांनी विद्यार्थ्यांना ‘नशामुक्त युवा’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. व्यसनामुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर होणाऱ्या परिणामांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. युवकांनी व्यसनांना सुरुवातीपासूनच नकार देत आपल्या भविष्यासाठी सकारात्मक आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.


श्री. मुजावर अली यांनीही विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व सांगत युवकांनी डिजिटल जगाचा जबाबदारीने वापर करावा, विविध प्रकारच्या ऑनलाइन प्रलोभनांपासून सावध राहावे आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहावे, याबाबत मार्गदर्शन केले.


यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून व्यसनांचे दुष्परिणाम, युवकांचे भविष्य आणि व्यसनमुक्त समाजाची गरज याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. पथनाट्याला उपस्थित विद्यार्थी व स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


यानंतर स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विषयावर चर्चा केली. व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी युवकांनी कोणती भूमिका बजावावी, समाजात जनजागृती कशी करावी आणि व्यसनाधीनतेपासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी कोणते सकारात्मक उपक्रम राबविता येतील, यावर विचारविनिमय करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवर अतिथी, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. सर्वांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा आणि इतरांनाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प केला. त्यानंतर ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’ या बॅनरवर उपस्थितांनी स्वाक्षरी करून नशामुक्त भारताच्या संकल्पाला आपला पाठिंबा दर्शविला.


कार्यक्रमाचे प्रभावी संचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक रोशन चौधरी यांनी केले, तर स्वयंसेविका संजना कैथल यांनी उपस्थितांचे आभार मानले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमंतू डंभारे, राजेश इंगोले, रोशन चौधरी, गौरव झाडे, आदित्य मंगरूळकर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व स्वयंसेवक सहभागी झाल्याने ‘नशामुक्त युवा—विकसित भारत’ या संकल्पनेला महाविद्यालयीन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला.


दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.