चंद्रपूर:- राज्यात सर्वत्र प्रारूप मतदार याद्या प्रकाशित झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि चर्चात्मक बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांचे सख्खे बंधू किशोर नामदेवराव वडेट्टीवार यांचे नाव तब्बल ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच करंजी ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत झळकले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणातील औत्सुक्याचा भाग म्हणजे, पतीचे नाव करंजीत तर त्यांच्या पत्नीचे नाव पानोरा ग्रामपंचायतीच्या यादीत नोंदवले गेले आहे.
विशेष म्हणजे, वडेट्टीवार कुटुंब काही दशकांपूर्वीच मूळ गाव सोडून गडचिरोली शहरात स्थायिक झाले होते. किशोर वडेट्टीवार यांचे नाव गडचिरोली नगरपरिषदेच्या यादीत असताना, अचानक निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे नाव करंजीच्या प्रारूप यादीत समाविष्ट झाल्याने स्थानिक राजकारणात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नोंद नेमकी कोणत्या तांत्रिक किंवा राजकीय आधारावर झाली, यावर प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि विरोधकांकडून यावर काय कायदेशीर हरकती घेतल्या जातात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
