Chandrapur News: खासदारांच्या पाहणी दौऱ्यात अवैध पार्किंगचा मुद्दा ऐरणीवर; कारवाई मात्र शून्य!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात रस्त्यांवर विनापरवाना व मनमानी पद्धतीने उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्सचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. खुद्द खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पाहणी दरम्यान या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत कडक कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली असून, पाहणी दौऱ्यात एकाही ट्रॅव्हल्सवर कारवाई झालेली नाही.

संसदीय रस्ता समितीच्या बैठकीनंतर चंद्रपूर शहरात विविध रस्त्यांची पाहणी मोहीम राबविण्यात आली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रावसाहेब रगडे, वाहतूक पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे, मनपा आयुक्त अकनुरी नरेश तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

या पाहणी दरम्यान शहरात जागोजागी रस्त्यावर अवैधरित्या उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सचा मुद्दा खासदारांनी गांभीर्याने उपस्थित केला. शहरातील मुख्य रस्त्यांवर ट्रॅव्हल्स उभ्या राहत असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो आणि अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेताच खासदार धानोरकर यांनी RTO आणि पोलीस विभागाला अशा अवैध ट्रॅव्हल्सवर तातडीने कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिले.


मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे हा पाहणी दौऱ्यात प्रत्यक्षात एकाही ट्रॅव्हल्सवर कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. विशेष म्हणजे, यासंदर्भात विचारणा केली असता RTO अधिकाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पाहता, प्रशासनाने केवळ तोंडी आदेश न देता तात्काळ कठोर पावले उचलावीत आणि ट्रॅव्हल्ससाठी स्वतंत्र पार्किंगची जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी आता चंद्रपूर शहरातून केली जात आहे.