Attack with an axe: क्षुल्लक वादातून काकाचा पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला

Bhairav Diwase
मुल:- क्षुल्लक शाब्दिक वादातून काकानेच आपल्या पुतण्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना बोंडाळा (खुर्द) येथे बुधवारी दि. २ सप्टेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली आहे. भोजराज सुधाकर बांगरे (वय ३२) जखमीचे नाव असून आरोपी काका श्रीरंग आत्माराम बांगरे (वय ६२) याला पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, भोजराज सुधाकर बांगरे हा तरुण नेहमीप्रमाणे आपले काका श्रीरंग आत्माराम बांगरे याच्या घरी गेला होता. तेथे दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता हा वाद कमालीचा विकोपाला गेला. संतापाच्या भरात काका श्रीरंगने घरात असलेली कुऱ्हाड काढून पुतण्या भोजराज याच्यावर थेट वार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात भोजराज हा रक्ताच्या थारोळ्यात पडून गंभीर जखमी झाला. नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत जखमी भोजराजला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

 सुदैवाने, वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय उपचारानंतर आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याप्रकरणी जखमी भोजराज बांगरे यांच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी आरोपी श्रीरंग बांगरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.