चंद्रपूर:- शेतात निंदणाचे काम सुरू असतानाच झाडावरील पोळ्यातील मधमाश्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात त्यांची पत्नीही गंभीर जखमी झाली आहे.
महिपाल कचरू येरमा (५५) असे मृत शेतमजुराचे नाव असून, शालू महिपाल येरमा (५०) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे घडली.
महिपाल व शालू येरमा हे मूळचे ब्रह्मपुरी येथील रहिवासी असून, मागील ३५ वर्षांपासून व्याहाड खुर्द येथे वास्तव्यास होते. अत्यंत सामान्य कुटुंबातील हे दांपत्य शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. यासाठी त्यांनी मनोहर डोंगरे यांची शेती ठेक्याने कसण्यासाठी घेतली होती.
सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतातील रोवणीचे काम आटोपून ते वाढलेले निंदण काढण्यासाठी सकाळी आपल्या शेतात गेले होते. यादरम्यान शेतातील झाडावरील मधमाशांच्या पोळ्यातील माशांनी अचानक त्यांच्यावर बेछूट हल्ला चढवला. हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी या दांपत्याने जवळच असलेल्या कालव्याच्या पाण्यात डोके बुडवून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु मधमाशांच्या असंख्य डंखांमुळे महिपाल येरमा शेतातच बेशुद्ध होऊन पडले.
दरम्यान, पत्नी शालू यांनी मदतीसाठी केलेल्या आरडाओरडानंतर परिसरातील नागरिक धावून आले. तात्काळ त्यांच्या मुलांना संपर्क साधून बेशुद्ध अवस्थेतील महिपाल यांना उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयात व नंतर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने महिपाल येरमा यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नी शालू यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अकल्पित घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
