Rajura firing Update: राजुऱ्यात रक्तरंजित थरार: भरदिवसा गोळीबार करून हत्या

Bhairav Diwase
जाधव हत्याकांडातील ४ आरोपींना बेड्या
राजुरा:- राजुरा न्यायालयाच्या अगदी समोर भरदिवसा झालेल्या गोळीबारात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पापा ऊर्फ विनोद जाधव हे राजुरा न्यायालयासमोर असलेल्या एका नारळ पाण्याच्या दुकानाजवळ बसले असताना ही धक्कादायक घटना घडली. तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पापा जाधव यांच्यावर अगदी जवळून तीन गोळ्या झाडल्या. यातील गोळ्या थेट डोक्यात लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भरवस्तीत आणि न्यायालयासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.


गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले नाहीत, तर त्यांनी थेट राजुरा पोलीस ठाण्यात जाऊन शरणागती पत्करली. पोलिसांनी तात्काळ करण मेकलवार आणि करण बाविसकर या दोघांना ताब्यात घेतले. तपासानंतर पोलिसांनी परवेश शेख आणि कार्तिक खामनकर या आणखी दोन आरोपींना अटक केली असून एकूण चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


दरम्यान, या हत्येमागील मुख्य सूत्रधार आणि कट रचणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी राजुरा पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. जमाव अनियंत्रित झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. याच गोंधळात संतप्त जमावाकडून उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. सध्या राजुरा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.