चंद्रपूर:- चंद्रपूर येथील सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने “Snake: Myth and Misconception” (साप: समज आणि गैरसमज) या विषयावर २४ ऑगस्ट रोजी एकदिवसीय जनजागृतीपर कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सापांविषयी समाजात पसरलेल्या विविध अंधश्रद्धा, भीती आणि गैरसमज दूर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, तसेच सर्पसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत मण्यार सापाच्या दंशामुळे तीन मुलींचा झालेला दुर्दैवी मृत्यू मन हेलावणारा ठरला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांमध्ये सर्पदंशाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, प्रमुख वक्ते भारतीय महाविद्यालय (मोर्शी, जि. अमरावती) येथील भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. सावन एम. देशमुख, कला विभाग प्रमुख डॉ. सुनीता बनसोड आणि भूगोल विभाग प्रमुख डॉ. निखिल देशमुख उपस्थित होते.
या कार्यशाळेत भारतीय महाविद्यालय (मोर्शी, जि. अमरावती) येथील भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. सावन एम. देशमुख यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सापांच्या विविध प्रजाती, त्यांचे अधिवास, विषारी व बिनविषारी सापांमधील फरक, तसेच सापांबद्दल समाजात असलेल्या विविध मिथकांची माहिती दिली. साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी सुरक्षित अंतर राखून सर्पमित्रांशी किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे संयोजक डॉ. निखिल देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दीपाली दांडेकर यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. कमलेश नागोसे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. "सापांना घाबरू नका, त्यांना समजून घ्या" या सकारात्मक संदेशासह राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता झाली.
